नागपूर : राज्यातील कृषीपंपांच्या वीज बिलात चुका आहेत, त्या येत्या वर्षभरात दुरुस्त केल्या जातील, अशी कबुली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यात 35 हजार कोटींची थकबाकी असल्याचं सांगत वीज बिलं भरण्याचं आवाहनही त्यांनी केलं.


ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजेच्या संदर्भातील प्रश्नांना विधानसभेत उत्तरं दिली. राज्यात 35 हजार कोटींची वीज थकबाकी आहे. त्यापैकी 22 हजार कोटी कृषीपंपांची थकबाकी आहे. थकबाकी वसूल झाल्याशिवाय महावितरण कंपनी चालणार नाही, असं सांगत त्यांनी आमदारांसह राज्यातील शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याचं आवाहन केलं.

सरकारने कृषीपंपांचे आठ हजार कोटींचं दंड व्याज माफ केलं आहे. तसेच थकबाकीदारांसाठी 3 आणि 5 हजार रुपये भरुन योजनेत सहभागी होण्याची योजना आणली आहे. वीज बिलं चुकीची आल्याची कबुली देत येत्या वर्षभरात वीज बिलांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

  • येत्या दोन महिन्यात 2 लाख 18 हजार कृषीपंपांना वीज जोडणी देणार.

  • शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी सुरु.

  • याअंतर्गत येत्या दोन वर्षात पाच लाख कनेक्शन सौरवर आणणार.

  • छोटे ट्रान्सफॉर्मर बसवून एक ते दोन शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जाणार