Nashik Weather: राज्यात थंडीचा कडाका आता चांगलाच वाढतोय. उत्तर, मध्य महाराष्ट्रात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक रस्त्यावर शेकाटीची ऊब घेत आहेत. पहाटे किमान तापमानात घट होत दाट धुक्याची चादर पसरली आहे.मंगळवारी मुंबईसह नाशिक, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात तापमान घसरले आहे. नाशिकमध्ये मंगळवारी 9.4 अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात साधारण 4 अंश सेल्सियसची घट झाल्याने नाशिक गारठलं होतं. थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशकातील मनपा हद्दीतील शाळा एक तास उशिरा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका शिक्षण विभागाने वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय.
मनपाच्या शाळा 7 ऐवजी 8 वाजाता भरणार आहे.तर खाजगी शाळा 8 ऐवजी 9 वाजता भरणार असल्याचं सांगण्यात आलंय.शहारत गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होवू नये यासाठी मनपाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता थंडीमुळे लहानग्यांच्या शाळेची घंटा तासभर उशीरा वाजणार आहे.
येत्या दोन दिवसात किमान तापमानात घट होणार
हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार ,उत्तरेकडील राज्यांमध्ये 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट राहणार असल्याचं सांगण्यात आलं . जम्मू काश्मीर , उत्तर प्रदेश , राजस्थान ' मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडीची लाट राहणार असून कोरडे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत . परिणामी उत्तर व पश्चिम महाराष्ट्र चांगलाच गारठलाय . राज्यात येत्या दोन दिवसात किमान तापमानात कमालीची घसरण होणार असल्याचा हवामान विभागांना सांगितलं . उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे . तर इतर ठिकाणीही हळूहळू तापमान घसरणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवले .
राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान
राज्यात येत्या पाच दिवसात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रावर असणारा कमी दाबाचा पट्टा आता पुढे सरकत बंगालचा उपसागर आणि भारतीय उपसागराच्या दिशेला आहे. येत्या 24 तासांत राज्याच्या तापमानात कमालीची घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेतील थंड कोरड्या वाऱ्यांनी राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.
नाशिकचा तापमानाचा पारा पुन्हा घसरला
नाशकात गेल्या काही दिवसांपूर्वी हलक्या पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरण असल्यानं थंडी कमी झाली होती. गेल्या 5 दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला होता. आता 8 अंशावर तापमानावर गेलं आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नाशिककर गारठले आहे.