मुंबई : देशात आणि राज्यात लसीकरण प्रक्रियेला अतिशय झपाट्यानं वेग आला आहे. त्यातच लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.  वय वर्ष 18 ते 44 अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात 5 कोटी 71 लाखांहून अधिक नागरिक आहेत. यासाठी तब्बल 12 कोटी लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा भार असणार आहे. पण, कोरोनाविरोधातील या लढ्यात राज्य शासनानं मोठ्या जबाबदारीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 


COWIN App Registration: कोविन ॲपवर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण नोंदणीला सुरुवात, नोंदणीदरम्यान तांत्रिक अडचणी


राज्यातील तरुणांना प्रतिक जयंत पाटलांचं आवाहन


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनी म्हटलं आहे की, लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार आहोत. स्वतःच्या लसीचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  आपल्याला शक्य असेल तर आपणही लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून द्या. आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदतीचा हातभार लावण्याची सध्या गरज आहे.देशाप्रती, राज्याप्रती असलेली जबाबदारी म्हणून ही भूमिका घेत आहे, असं आवाहन त्यांनी तरुणांना केलं आहे.  


Covid 19 Vaccination Free : महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय


सत्यजीत तांबे यांचेही आवाहन
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी देखील याबाबत आवाहन करताना म्हटलं आहे की, महाराष्ट्र शासनाने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व तरुणांच्या वतीने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संपूर्ण महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. तसेच मी पैसे देण्यास सक्षम असलेल्या सर्वांना आवाहन करतो की, कृपया मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लसीची रक्कम दान करा ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल, असं तांबे यांनी म्हटलं आहे.