Ashadhi Wari 2022 : दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून आज नवमीला शहरात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागे शेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे. यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपार पर्यंत जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून वाटून दिलेल्या प्लॉटवर त्यांनी आपले तंबू उभारले आहेत. या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे शुद्ध पाणी, आरोग्य व्यवस्था, स्वच्छतागृहे, वीज, डांबरी रस्ते आणि सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच या ठिकाणी पाच लाखांपेक्षा जास्त भाविकांना येथे निवासाची सोय झाली आहे.

  


आज नवमीला चंद्रभागा स्नानासाठी लोटला हजारोंचा जनसागर, बुडणाऱ्या 15 भाविकांना वजीर रेस्क्यू टीमने वाचवले 


आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जसे विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते तशीच ओढ चंद्रभागेच्या स्नानाची असते. सध्या लाखो भाविक पंढरीत दाखल झाले असताना चंद्रभागा वाळवंटावर देखील भाविकांचा अथांग जनसागर लोटला आहे. चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी असली तरी आषाढी यात्रेला उजनी धरणातून सोडलेले पाणी पात्रात पोहोचल्याने पाणी पातळी देखील जास्त आहे. यातच चंद्रभागेच्या पात्रात वाळू माफियांनी वाळू उपसा करून मोठ मोठे खड्डे केल्याचा फटका भाविकांना बसत आहे. यामुळेच प्रशासनाने पात्रामध्ये आपत्कालीन व्यवस्थेच्या बोटी नदीपात्रात फिरवणे सुरु ठेवले असून या टीमने आत्तापर्यंत जवळपास 15 बुडणाऱ्या भाविकांना वाचविण्याचे काम केले आहे. भाविकांच्या चंद्रभागा स्नानाचा मोठा उत्साह दिसत असून अबालवृयुद्ध चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात स्नानाचा आनंद घेत आहेत. याचसोबत शेकडो भाविक नौकानयनाच्या देखील आनंद घेत आहेत. चंद्रभागेचे सर्व घाट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असून चंद्रभागा तीरावर भाविकांचा महापूर आला आहे. 


महत्वाच्या बातम्या :