बेळगाव : साखर कारखाने सुरु झाले असून बैलगाडी, ट्रक आणि ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक केली जात आहे. बैलगाडी वाहणाऱ्या बैलावर ओझे किती लादायचे याचा विचार शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे. मंड्या जिल्ह्यातील जिंगूडीपट्टण येथील एका शेतकऱ्याने बैलगाडीतून चौदा टन उसाची वाहतूक केली आहे. ही घटना जिंगूडीपट्टण येथील असली तरी सध्या हा सगळीकडे चर्चेचा विषय झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या कर्नाटकात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


रंजू नावाच्या शेतकऱ्याच्या बैलगाडीतून बोगेगौडा या शेतकऱ्याने चौदा टन बैलगाडीतून ऊस नेण्याचा विक्रम केला आहे. एखादा ट्रक जितका ऊस नेतो तितका ऊस बैलगाडीतून नेण्यात आला. ट्रॅक्टरमधून सहा ते सात टन तर ट्रकमधून 14 ते 15 टन वाहतूक केली जाते. पंरतु जेवढा टन ऊस ट्रकमधून वाहून नेला जातो तेवढ्याच ऊसाची वाहतूक या शेतकऱ्याने बैलगाडीतून केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


ऊसाची चौदा टन वाहतूक केलेल्या घटनेवर कोणी शंका उपस्थित करेल म्हणून त्या शेतकऱ्याने चंद्र मौलेश्र्वर स्वामी आणि ब्रिजवर बैलगाडीचे ऊसासह वजन केल्याची पावती देखील ठेवली आहे. जास्तीत जास्त ऊसाची वाहतूक बैलगाडीतून करुन शेतकरी फुशारकी मारत असला तरी बैलगाडी वाहणारे बैल मात्र तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो असेच म्हणत असतील.



मंड्या जिल्ह्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ऊस न्यायच्या वेळी शेतकऱ्यांमध्ये बैलगाडीतून कोण अधिक ऊस नेतो याच्या पैजा लागतात. बैलगाडीतून चौदा टन ऊस नेला जात असताना रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे बैलगाडीत चौदा टन ऊस असल्याची वे ब्रिजवर वजन करुन नोंद करण्यात आली आहे.


साधारणत: ट्रक किंवा ट्रॅक्टरमधून ऊसाची वाहतूक केली जाते. पण अनेक ठिकाणी बैलगाडीही वापरली जाते. परंतु बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतूक केल्याने अपघातांनाही निमंत्रण मिळतं. याशिवाय बैलांना होणारा त्रास वेगळेचा. बऱ्याच घटनांमध्ये अशी वाहतूक करण्यासाठी बैलगाडीला जुंपणाऱ्या बैलांचा जीव गेल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अशा नसतं धाडस आणि पैजांमुळे मुक्या प्राण्यांना त्रास होतो किंवा त्यांचा नाहक बळी जातो.