अहमदनगर : अहमदनगरमध्ये नवी राजकीय खेळी रंगली आणि जास्त जागा असूनही शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला. मात्र नगरमध्ये शिवसेनेचा गेम कसा काय झाला, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.


अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाची आज निवडणूक पार पडली. मात्र निवडणूक गाजली, ती तिथे झालेल्या अनपेक्षित युतीमुळेच. दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेचा निकाल लागला. 68 जागा असलेल्या अहमदनगरमध्ये बहुमतासाठी 35 जागांची बेगमी करावी लागते.

अहमदनगरच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे विराजमान झाल्या. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. अहमदनगर महानगरपालिका निडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. मात्र मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली.

अहमदनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना  24

राष्ट्रवादी 18

भाजप 14

काँग्रेस 5

बसपा 4

सपा 1

अपक्ष 2

पहिल्या क्रमांकाच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. कर्नाटकात जे काँग्रेसने केलं, तेच भाजपने अहमदनगरमध्ये केलं, आकड्यांची जुळवाजुळव इतकी पक्की केली की भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना 37 मतं मिळाली.

अहमदनगरमध्ये कमळ कसं फुललं?

भाजप            14
राष्ट्रवादी         18
बसपा             04
अपक्ष             01

एकूण            37

शिवसेनेचा गेम कसा झाला?

शिवसेनेचे अहमदनगरमधील सूत्रधार अनिल राठोड हे खासदार दिलीप गांधी यांच्याशिवाय भाजपची साथ घेण्याचा अट्टाहास करत होते. त्यामुळे भाजपकडे शिवसेनेचा कोणताही अधिकृत प्रस्तावच गेला नाही. भाजपने 'आपल्याला हवा तसा' प्रस्ताव पाठवावा, असा शिवसेनेचा हट्ट होता. बहुदा भाजप तटस्थ राहील आणि बसप, तसेच तीन अपक्षांच्या साथीने आपला महापौर होईल, असा त्यांचा कयास होता.

भाजपचे चाणक्य त्याचवेळी नेमकं काय करावं, या पेचात होते. भाजप आमदार शिवाजी कर्डीले गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना 'सह्याद्री'वर भेटले. आमदार कर्डिलेंचे जावई संग्राम जगताप राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते जलसंपदामंत्री गिरीश महाजनांच्या संपर्कात आले. दोघांशी झालेल्या चर्चेनंतर भाजपने महापौर-उपमहापौर आमचाच होईल, असा दावा केला.

राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सकाळी भाजप नेत्यांच्या संपर्कात आले. भाजप नगरसेवकांच्या जोडीनेच राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सभागृहात गेले. भाजप-राष्ट्रवादी नगरसेवकांना एकत्र पाहून शिवसेनेचा गेम झाला, हे उघड झालं.

अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा नाही, असे आदेश असतानाही नगरसेवकांनी भाजपला मत का दिलं? याची चौकशी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली. नगरसेवकांकडून खुलासा मागितला असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे आधी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा आणि मग कारवाईचा इशारा अशी दुतोंडी भूमिका राष्ट्रवादी बजावत आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापौर निवडणुकीतली ही यारी-दोस्ती लक्षणीय ठरली आहे. देशासह राज्यात आघाडी-महाआघाडीचे वारु दामटवण्याचा प्रयत्न सुरु असताना अहमदनगरने मात्र वेगळंच राजकीय वळण घेतलं. लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर याचा काय परिणाम होतोय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.