शिर्डी : साईबाबांचा 101 वा पुण्यतिथी उत्सवाला शिर्डीत आजपासून प्रारंभ झाला आहे. विजयादशमीच्या दिवशीच साईबाबा समाधीस्त झाले होते. साई संस्थानच्या वतीने चार दिवस हा पुण्यतिथी उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.
यावर्षीही उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे उद्या साई भक्तांसाठी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. हजारो भाविक साईसमाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत.
विजयादशमीच्या दिवशी 1918 साली शिर्डीच्या साईबाबांचे देहावसान झाले होते. 1919 पासून आजपर्यंत विजयादशमीच्या दिवशी साईबाबांची पुण्यतिथी साजरा केली जाते. तीन दिवस हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे, मात्र यावर्षी तिसऱ्या दिवशी एकादशी आल्याने चार दिवस उत्सव साजरा केला जाणार आहे.
साई मंदिर परिसरातील उत्सवासाठी साईबाबा संस्थानने जय्यत तयारी केली असून साई मंदिर फुलांनी सजवण्यात आलं आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. देशभरातून लाखो भाविक उत्सवानिमित्त साईंच्या दर्शनात शिर्डीत येतात.