मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षावर अन्याय झाला असून भाजपने आमच्यावर अन्याय केला असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. दौंडचे उमेदवार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर त्यांनी अर्ज भरले. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असेही जानकर यांनी सांगितले.


आम्हाला महायुतीत दोन जागा सोडल्या पण आमच्या चिन्हावर लढण्याचं भाजपने मान्य केले होते. पण आम्हाला बी फॉर्म देण्यात आला नाही. भाजपने आमच्यासोबत धोका केला, असे जानकर म्हणाले.

गंगाखेडला रासपचा अधिकृत उमेदवार आहे. रत्नाकर गुट्टे हे आता आमचे अधिकृत उमेदवार आहेत, असेही ते म्हणाले. गंगाखेडची जागा महायुतीत सेनेला सोडली आहे. मात्र तिथे आमचा उमेदवार लढणार आहे असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी तिथून शिवसेनेच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगावे. अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही ते म्हणाले.

आज आम्ही महायुतीतून बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही. आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच लढणार आहोत. 288 जागांवर मी महायुतीला मदत करणार आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली.  हे बरोबर आहे, मात्र आज शिवसेना जात्यात आहे आणि मी पण भरडलो गेलो आहे, असेही ते म्हणाले.

जिंतूर आणि दौंडमध्ये माझे कार्यकर्ते मदत करायची का ते निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. तसेच गोपीचंद पडळकर हे साधे कार्यकर्ते आहेत, मी एका पक्षाचा प्रमुख आहे. मी राष्ट्रीय नेता आहे. त्यांच्याशी माझी तुलना करणं चुकीचं आहे, असेही जानकर म्हणाले.

भाजपने महायुतीमध्ये मित्रपक्षांना 18 जागा देण्याचे कबूल केले होते.