Hingoli News : रेल्वे संघर्ष समिती आणि हिंगोलीकरांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे.  लवकरच हिंगोलीवरुन मुंबईला रेल्वे (Hingoli to Mumbai railway service) सुरू होणार आहे. हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करा, या मागणीसाठी रेल्वे संघर्ष समिती आणि सर्व हिंगोलीकरांच्या वतीनं 23 नोव्हेंबरला रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं होतं.  आंदोलकांनी तेव्हा अमरावती-तिरुपती एक्सप्रेस रोखून आंदोलन केलं होतं. अखेर या आंदोलनाला यश आलं असून लवकरच काजीपेठ दादर ही रेल्वे फेरी सुरू होणार आहे.  


हिंगोलीकरांच्या वतीनं 23 नोव्हेंबरला रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलकांनी तेव्हा अमरावती तिरुपती एक्सप्रेस रोखून धरली होती. याबाबत आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आता या आंदोलनाला यश आले आहे. आता काजीपेठ दादर ही रेल्वे फेरी लवकर सुरू होणार आहे. ही रेल्वे फेरी दादर-औरंगाबाद-पूर्णा-हिंगोली-अकोला-वर्धा-बल्लारशाह-बरास्ता-काजीपेट आशा प्रवास करणार आहे.  या माध्यमातून हिंगोलीचा आता थेट मुंबईशी संपर्क राहणार आहे.


अनेक दिवसापासूनची मागणी


हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जायचं असेल तर परभणी किंवा नांदेडहून  पुढील प्रवास रेल्वेने करावा लागतो. हिंगोलीहून मुंबईसाठी रेल्वे फेरी सुरू करावी म्हणून, गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे संघर्ष समिती व्यापारी त्याचबरोबर हिंगोलीकर हे प्रशासन दरबारी अर्ज विनंती करत आहेत. परंतू याची कोणतीही दखल प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही. त्यामुळं हिंगोलीकरांनी 23 नोव्हेंबरला आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं होतं. या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींचा सहभाग दिसून आला होता. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यासह अनेक सामाजिक संघटना व्यापारी त्याचबरोबर वकील आणि पत्रकारांचा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग होता. हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करा यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं.


काय होणार फायदा


हिंगोलीवरुन  मुंबईला जाणारी कोणतीही रेल्वे नाही. त्यामुळं कार्यालयीन कामकाजानिमित्त मुंबई जाणाऱ्या नागरिकांना आणि व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. जर ही रेल्वे फेरी सुरू झाली तर कार्यालयीन कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना त्याचबरोबर व्यवसायासाठी दळणवळणाला साईस्कर होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील व्यवसायाला सुद्धा यामुळं चालना मिळणार आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी हिंगोलीकरांचा थेट संपर्क राहण्यास मदत होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Hingoli News : हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी हिंगोलीकर आक्रमक, अमरावती-तिरुपती एक्सप्रेस रोखली