नागपूर : नागपुरात चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या एकाचा बांगलादेशातील अन्सारुल बांगलादेशी टीम या विघातक संघटनेशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. चारही जण भारतात बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करण्याच्या नावाखाली घुसल्याचं समोर आलं आहे.


रॉकी बरुआ, सुदर्शन तालुकदार, विप्लव तालुकदार आणि प्रदीप बरुआ अशी या चौघांची नावं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या चारही बांगलादेशींनी स्वत:ला भारतीय सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड आणि पासपोर्ट असे दस्तावेज बनविले होते.


धर्म प्रसारकाच्या नावाखाली भारतात शिरून येथील गर्दीत मिसळून जाण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय होता, याचा पोलीस शोध घेत आहेत. गेले तीन महिन्यापासून नागपूरच्या सुरेंद्रगड भागात गांधी चौकाजवळ एका घरात भाड्याने ते राहत होते.


चार बांगलादेशी बौद्ध भिक्षुंच्या वेशात नागपुरात राहत असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे या चौघांवर पोलिसांनी नजर ठेवली आणि त्यांच्या संशयास्पद हालचालींनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत चौघे बांगलीदेशी असल्याचं समोर आलं. नागपूर पोलीस सध्या त्यांची कसून चौकशी करत आहेत.