औरंगाबाद : सिरीयल किलर इम्रान मेहंदीसह आठ जणांना औरंगाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि रॉक्सी सिनेमाचे मालक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी कोर्टाने निकाल दिला.


औरंगाबादमध्ये राहणारे सलीम कुरेशी पाच मार्च 2012 ला रात्री रॉक्सी टॉकीजकडून घरी जात होते. टाऊन हॉलजवळ त्यांची कार अडवून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. दोन दिवसांनंतर सलीम कुरेशींची कार सिल्लेखान्यातील मुख्य रस्त्यावर सोडून मारेकरी निघून गेले. बेगमपुरा पोलिस ठाण्यात सलीम कुरेशींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान इम्रान मेहंदीच्या टोळीला मोक्का लावण्यात आला. या प्रकरणी 66 साक्षीदार तपासले गेले, तर 11 फितुर झाले. सत्र न्यायालयाने इम्रान मेहंदीसह आठ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 15 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. इम्रानवर एकूण पाच हत्यांचे आरोप आहेत.

मेहंदीला न्यायालयात हजर करताना पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याची योजना होती. यासाठी मध्यप्रदेशमधून 10 जण आले होते. त्यांच्याकडे 1 पिस्तुल आणि 8 जिवंत काडतुसंही सापडली. औरंगाबाद पोलिसांनी ही कारवाई केली.