कोल्हापूर : चित्रपटातील हिरोप्रमाणे आकर्षक पिळदार शरीरयष्टी व्हावी, लक्ष वेधून घेणारे सिक्स पॅक असावेत अशी अनेक तरुणांची इच्छा असते. मात्र शास्त्रशुद्ध मार्गदर्शन न घेता अतिरेकी सप्लिमेंट्स घेणं कोल्हापुरातील तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. 24 वर्षीय तरुणाच्या हृदयामध्ये 'ब्लॉकेज' निर्माण झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.
कोल्हापुरात राहणाऱ्या संबंधित तरुणाचं लग्न ठरवण्याबाबत कुटुंबीयांच्या हालचाली सुरु होत्या. पिळदार शरीरयष्टी बनवून जोडीदाराला प्रभावित करण्यासाठी त्याने जिमला जाण्यास सुरुवात केली.
किरकोळ शरीरयष्टी असल्यामुळे 'सप्लिमेंट' पावडर घेण्याचा सल्ला तरुणाला त्याचे मित्र आणि ट्रेनरने दिला. आहारात दररोज बारा अंडी घेण्यासही सांगितलं. तरुणाने तसा आहार घ्यायला सुरुवात करताच पाचव्या दिवशी त्याला छातीत दुखून अस्वस्थ वाटायला लागलं.
दोन दिवस पित्त जास्त झालं असेल, असं गृहित धरुन तरुणाने त्यावर मेडिकल दुकानातून औषधाच्या गोळ्या घेतल्या आणि छातीतील दुखण्याकडे दुर्लक्ष केले.
व्यायाम करताना छातीत प्रचंड दुखू लागल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी या तरुणाच्या हृदयाची अँजिओग्राफी करताच हृद्यातील रक्तवाहिन्यांत अडथळे निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
हृदयरोग विभागातील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन शस्रक्रिया केली आणि त्याचा जीव वाचवला. हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.
अल्पावधीत बॉडी कमावण्याच्या नादात तरुणाईने मान्यता नसणाऱ्या सप्लिमेंट पावडरींचं सेवन करु नये. डॉक्टर किंवा अनुभवी न्युट्रीशिअनच्या सल्ल्याने आहारात बदल करावेत. अनुभव नसलेल्या मार्गदर्शकांकडून घेतलेला सल्ला जीवावर बेतू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.
ट्रेनरकडे त्या विषयातील शास्त्रीय ज्ञान आहे का,त्याने आवश्यक शिक्षण घेतले आहे का, याची खात्री करावी. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्याने व्यायाम प्रकार आणि आहाराची निवड करताना विशेष दक्षता घ्यावी लागते.
सध्याची पिढी आरोग्याबाबत सजग आहे. जिमकडे तरुणाईचा वाढलेला कल कौतुकास्पद असला तरी ट्रेनर निवडताना आणि आहार घेताना काळजी घेणं गरजेचं आहे.
सिक्स पॅकच्या हट्टापायी चुकीचा आहार, तरुणाच्या हृदयात ब्लॉकेज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2018 05:57 PM (IST)
कोल्हापुरात चुकीच्या आहारामुळे 24 वर्षीय तरुणाच्या हृदयामध्ये 'ब्लॉकेज' निर्माण होऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -