खानापूर (बेळगाव): बेळगावमधील खानापूरजवळ किंग कोब्रा जातीचा ११.२ फूट लांबीचा नाग आज पकडण्यात आला. सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी आज खानापूरजवळ नरोन्हानगर, असोगा येथे हा भलामोठा नाग पकडला. गेल्या पाच दिवसापासून हा नाग येथील रहिवाशांना दिसत होता त्यामुळे येथं भीतीचं वातावरण पसरले होते. याबाबत वनखात्याला माहिती देण्यात आली. वनखात्याने सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना ही माहिती दिली.
शुक्रवारी सकाळी सर्पमित्र आनंद चिठ्ठी आणि त्यांच्या पत्नी निर्झरा चिठ्ठी यांनी नरोन्हानगर परिसरात सापाचा शोध सुरु केला. त्यावेळी झाडाच्या ढोलीतून बाहेर पडत असलेला साप त्यांना दिसला. त्यावेळी सापाला त्यांनी अगदी सहजपणे पकडले. सापाला पकडल्यावर आनंद चिठ्ठी यांच्या लक्षात आले की हा सर्वात विषारी म्हणून ओळखला जाणारा किंग कोब्रा नाग आहे. त्याची लांबी पाहून उपस्थित वनकर्मचारी आणि नागरिकही आश्चर्यचकित झाले.
पकडलेला किंग कोब्रा हा सात वर्षाचा असून मादी जातीचा आहे. किंग कोब्राला अरण्यात सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आल्याची माहिती सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी दिली.