मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांना हृदयाच्या आजाराचा त्रास होता. त्यांचा अंत्यविधी आज साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत. 


धनंजय जाधव यांचे मुळ गाव साताऱ्यातील पुसेगाव. याच ठिकाणी 1947 साली त्यांचा जन्म झाला. पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर माध्यमिक शिक्षण वाई येथे झाले. त्यानंतर त्यांनी MSc ची पदव्युत्तर पदवी घेतली. 


प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. 1972 ला ते युपीएससीची परीक्षा पास झाले आणि IPS म्हणून धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं. पुणे येथे  DCP म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची नियुक्ती  मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली. 


काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी 2004 ते 2007 या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली. ते या पदावर 2007 ते 2008 या काळात होते आणि निवृत्त झाले. 


निवृत्ती नंतर त्यांनी एमपीएससी बोर्डवर दोन वर्षे काम केलं. नंतर त्यांच्या मुळ गावी, पुसेगाव या ठिकाणी त्यांनी एक शिक्षण संस्था सुरु केली. शेती करत ते या संस्ठेचे काम पहायचे. धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. निवृत्ती नंतर त्यांना अनेक पक्षातून आॕफर होती पण त्यांनी राजकारणापासून अलिप्त रहायचा निर्णय घेतला. 


महत्वाच्या बातम्या :