Anand Paranjape : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची निवड करण्यात आली आहे. परांजपे यांना आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीच पत्र प्रदान केलं. दरम्यान, येत्या 18 ते 19 जानेवारीला   शिर्डीमध्ये पक्षाचे शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. छत्रपती  संभाजीनगरमध्ये हे शिबिर होणार होते. मात्र, शिबिरीचे ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली.  


सभासद नोंदणी हा महत्त्वाचा भाग असणार आहे. सभासद नोंदणीचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे. विविध जिल्ह्यात शहरांमध्ये सुद्धा सभासद नोंदणी व्हावी यासाठी नेमणूक केली जाणार आहे.वेगवेगळे राष्ट्रीय विश्लेषकांना निमंत्रण देणार आहे. पक्षाचे सर्वच प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून तयारी केली जाणार असल्याचे तटकरे म्हणाले.


आमचाच पक्ष खरा, जनतेनं शिक्कामोर्तब केलाय


जेव्हा निवडणुका दृष्टिक्षेपात येथील तेव्हा आम्ही एकत्र बसून चर्चा करुन निर्णय घेऊ असे तटकरे म्हणाले. बाकी आमचा समन्वय उत्तम आहे असेही ते म्हणाले. अमित शाह या देशाचे वरिष्ठ नेते आहेत. या देशात वेगवेगळ्या निर्णय घेण्यात त्यांचं योगदान आहे. लोकसभेतनंतर विधानसभेत आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलो आणि जनतेने शिक्कामोर्तब केला आहे की आमचाच पक्ष खरा आहे असं तटकरे म्हणाले. शरद पवार हे गेली सहा दशक राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत. पवार साहेबांच्या संदर्भात मी कुठलाही वक्तव्य करणार नाही हे मी ठरवलं होतं असेही तटकरे म्हणाले.  


 छगन भुजबळ शिबाराला उपस्थित राहणार का?


छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या शिबिरात सहभागी होणार का? असा देखील सुनिल तटकरे यांनी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तटकरे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी उपस्थित रहावे असे आम्ही त्यांना सांगितलं आहे. ते उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत असेही तटकरे म्हणाले. 


संतोष देशमुख हत्या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी हे आम्ही आधीपासूनचे म्हणत आहोत.यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे. ही घटना संवेदनशील असल्यामुळं मी राजकीय बोलणार नाही. असे तटकरे म्हणाले. धनंजय मुंडे यांच्यावर मी आज काही बोलणार नाही. तपास यंत्रणा तपास करत आहेत असेही ते म्हणाले. 


पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना


पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मी स्वतः अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून राहिलो आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील असे तटकरे म्हणाले. ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असेही तटकरे म्हणाले.