Anil Deshmukh : जेजे रूग्णालयातील जेल वॉर्डात योग्य वैद्यकीय सोयी सुविधा उपल्बध नसल्यामुळे आपल्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात यावं, अशी विनंती अनिल देशमुख यांनी सोमवारी कोर्टापुढे केली. तसेच आपल्याला घरच्या जेवणाचा डबा देण्याचा अर्ज त्यांच्यावतीनं कोर्टापुढे सादर करण्यात आला. मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणीसाठी त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.
अनिल देशमुख यांच्या या दोन्ही मागण्यांबाबत कोर्टाने ईडीला विचारलं असता, ईडीच्या वकिलांनी स्पष्ट केलं की, घरच्या जेवणाबद्दल त्यांचा काहीच आक्षेप नाही, यावर कोर्टानं योग्य तो निर्णय घ्यावा. मात्र, खासगी रूग्णालयातील उपचारांबाबत पुढील सुनावणीवेळी उत्तर देऊ असं ईडीने म्हटलं आहे. याची नोंद घेत मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी 4 एप्रिल रोजी यावर निर्देश देऊ असं जाहीर केलं.
आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्र न्यायालयात नव्यानं दाखल केलेल्या या अर्जांवर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जेजे रुग्णालय प्रशासनाला यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. त्यावेळी अनिल देशमुख यांनी आपल्या आजारांबद्दल स्वतः माहिती न्यायालयाला दिली. आपल्याला खांदेदुखीचा मोठा त्रास आहे. तसेच -हृदय विकाराचीही समस्या असल्याचं त्यांनी न्यायालयाला माहिती देताना सांगितले.
जेजे रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे आपले वाढते वय पाहता आपल्याला सरकारी रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुखांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली. त्याला विरोध करत खासगी रूग्णालयात उपचार घेण्यासंदर्भात उत्तर देण्यास ईडीने न्यायालयाकडे वेळ मागितला.
अनिल देशमुख यांना आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्याच्या सुनावणीस आरोपींनी उपस्थित राहणं गरजेचं असतं. दरम्यान, याच प्रकरणातील सहआरोपी आणि देशमुखांचे पुत्र ऋषिकेश आणि सलील देशमुख यांनी मात्र कोर्टातील उपस्थितीतून सूट देण्यासाठी पुन्हा एकदा विनंती अर्ज सादर केला.
मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणात अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात 23 मे रोजी सुनावणी होणार आहे. देशमुखांविरोधातील आरोपपत्रात ऋषिकेश देशमुख यांचंही नाव असल्यानं त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडीनं मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली आहे. 21 एप्रिल 2021 रोजी देशमुखांविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.
महत्वाच्या बातम्या