मुंबई  :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानपरिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती मी जाता-जाता देखील करणार नव्हतो, कारण, त्यावेळीचे मुख्यमंत्री याबाबत पत्र लिहून राज्यपालांना अधिकार नसल्याचे सांगतात. पंधरा दिवसांच्या आत 12 आमदारांच्या नियुक्ती यादीवर सही करण्याची धमकी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.  


राज्यपाल पदावर असताना केलेल्या वक्तव्यावरून भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी देखील महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीनंतर काही काळात कोश्यारी यांनी स्वत: आपल्याला पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आणि राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. 


"12 आमदारांच्या नियुक्तीसाठी पत्र लिहिलं ते ठीक आहे. पण हे पत्र पाच ओळींचं असायला पाहिजे होतं. त्यासोबत नियुक्ती करण्यात येणाऱ्या आमदारांची नावे आणि त्यांचा बायोडाटा पाठवणे आवश्यक होते. परंतु 15 दिवसांच्या आत आमदारांची नियुक्ती करावी अशी मला धमकी देण्यात आली. राज्यपालांना निर्देश दिले जात नाहीत. तो माझा अधिकार होता. मी 15 दिवसांमध्ये नियुक्ती करू किंवा शंभर दिवसात करू तो माझा अधिकार होता. माझा कोणत्याही नावाला आक्षेप नव्हता. परंतु पत्र लिहून धमकी देण्यात आल्यामुळेच मी आमदारांची नियुक्ती केली नाही, असे भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.   


"मला देण्यात आलेल्या 12 आमदारांच्या यादीतील नावे अनेकवेळा बदलली गेली. शिवाय मला धमकी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना कधी आदेश दिला जातो का? परंतु, मला तसे आदेश दिले गेले. महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांसोबत माझे संबंध चांगले आहेत. आदित्य ठाकरे हे तर मला मुलासारखे आहेत, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले. 


दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल देखील आज पहिल्यांदाच मौन सोडलं. ''देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माझ्याकडे लिस्ट घेऊन आले. त्यांनी सांगितलं आम्ही बहुमत सिद्ध करू. मीही म्हटलं, ठीक आहे. कारण घटनेत दिलेल्या निर्देशानुसार विधनासभेत बहुमत सिद्ध केलं जातं. बहुमत राज्यपालांसमोर किंवा राष्ट्रपतींसमोर जाऊन सिद्ध केलं जात नाही. यात दुसरं कोणी नव्हतं, त्यामुळे मीही म्हटलं, तुम्ही शपथ घ्या आणि बहुमत सिद्ध करा. यात माझं कुठं चुकलं? कोणी संविधान तज्ज्ञ असेल तर त्यांनी यात काय चुकलंय ते सांगावं.'' असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं.    


महत्वाच्या बातम्या


Bhagat Singh Koshyari On Fadnavis-Pawar Swearing: पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाले..