हिंगोली : हिंगोलीमधील राज्य राखीव पोलीस दलाच्या गाजलेल्या पोलीस भरती घोटाळ्याप्रकरणी एसआरपीचे तत्कालीन समादेश आणि हिंगोलीचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांना पोलिसांनी गजाआड केलं आहे. अटकेतील आरोपी मिठ्ठेवाड यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली. हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दल गट क्र. 12 च्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याचं राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत समोर आलं होतं. त्यानंतर 11 मे 2018 रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये तत्कालीन सहाय्यक समादेशक जयराम फुपाटे, सुत्रधार पोलीस चालक नामदेव ढाकणे, एस.एस.जी. सॉफ्टवेअर कंपनीचे ऑपरेटर शिरीष औधुत, पोलीस कर्मचारी शेख महेबुब शेख आगा यांच्यासह गुण वाढवून नोकरी मिळवणाऱ्या 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाकडे होता. 2013 मध्ये चार, 2014 मध्ये दहा तर 2017 मध्ये सहा अशा एकूण 20 जणांचे गुण वाढवून त्यांची एसआरपीत भरती करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशीसाठी एसआरपीचे तत्कालीन समादेशक तथा हिंगोलीचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामेदव मिठ्ठेवाड यांना आज बोलावलं होतं. मर्जीतील उमदेवारांचे चांगभलं करण्यासाठी दिलेली उत्तरपत्रिका आणि संगणकातील बाबी उघड झाल्यानंतर पोलिसांनी नामदेव मिठ्ठेवाड यांना अटक केली. यानंतर हिंगोली इथल्या न्यायालयाने मिठ्ठेवाड यांना हजर केल्यावर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे मदणे यांनी सांगितलं.