लातूर :  रेल्वेमध्ये टीसी पदावर भरती करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात मुरूड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये भाजप सभापतीचा समावेश आहे.

रेल्वेमध्ये टीसी पदावर भरती करण्याचे अमिष दाखवून लातूर जिल्ह्यातील चाटा या गावातील बळीराम बाबासाहेब गुटे यांच्याकडून बीड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती संतोष हांगे, गणेश आंधळकर आणि मुकुंद काळे यांनी तब्बल 7 लाख रुपये घेतले होते.

29 ऑक्टोबर 2013 रोजी गुटे यांच्याकडून  सभापती संतोष हांगे, गणेश आधंळकर आणि मुकुंद काळे यांनी तब्बल 7 लाख रुपये घेतले होते. एवढेच नाही तर टीसी पदावर भरती झाल्याचे बनावट आदेशही दिले होते. त्यानंतर बळीराम गुटे यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.  गुटे हे कलकत्ता येथे कामावर रुजू होण्यासाठी गेले असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

मागील अनेक महिन्यापासून बळीराम यांनी त्यांच्याकडे आपल्या पैशांची मागणी केली मात्र त्याला पैसेही परत दिले नाहीत. अखेर बळीराम गुटे यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी बुधवारी मुरूड येथील पोलीस ठाण्यात बीड जिल्ह्यातील या तिघांविरोधात तक्रार नोंद केली आहे.