मुंबई : पूजा चव्हाणमृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) राजीनामा दिला होता. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत.


रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नाही. याचा अर्थ असा की कायदेशीरदृष्ट्या संजय राठोड वनमंत्री पदावर कायम आहेत.


राजीनामा देण्याआधी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.


काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?

मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात आली होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली होती. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.






Sanjay Rathod Resign | राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...