बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी छावणी मालकांशी चर्चादेखील केली. छावणी मालक छावणी बंद करणार होते. परंतु पावारांशी चर्चा केल्यानंतर चारा छावणी बंद करण्याच्या निर्णयास मालकांनी तूर्तास स्थगिती दिली आहे.
शरद पवार सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी भागांना ते भेट देत आहेत. काल (रविवार, 13 मे) पवारांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याला भेट दिली. दुष्काळ दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात पवार यांनी बीड जिल्ह्याला भेट दिली आहे. पवारांनी आज बीडमधील चारा छावणीला भेट दिली.
चारा छावणीच्या मालकासोबतच्या भेटीनंतर पवारांनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितले की, छावणी मालक छावणी बंद करणार होते. परंतु मी त्यांना विनंती केली की छावणी बंद करु नका, आता ते थांबायला तयार आहेत
पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला, येत्या चार-पाच दिवसात मी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. या भेटीत मी त्यांच्यापुढे दुष्काळासंबधीचे सर्व प्रश्न मांडेन. राज्य आणि केंद्र सरकारकडे सहायतेसाठी आग्रह करणार आहे.
दरम्यान काल माण तालुक्यातील चारा छावण्यांना दिलेल्या भेटीनंतर पावारांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत 'जाणता राजा' किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावे, असे खुले आव्हान चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना दिले होते. पाटलांच्या या विधानाचा शरद पवारांनी आज समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले की, मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही, तिथे मुंबईत बसून व्याख्यानं आणि आव्हानं देत बसण्यापेक्षा राज्यभरातील दुष्काळाची पाहणी करावी, तेव्हाच तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती समजेल. मी दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी जिथे-जिथे फिरलो आहे. तिथले लोक मला सांगत आहेत की, गावांमध्ये पिण्यासाठीदेखील पाणी नाही. पाणी खूप दिवसांनी येतं. चारा छावण्यांमध्येदेखील खूप कडक नियम आहेत. रोजगार हमी योजनेत लोकांना कामं मिळत नाही.
शरद पवारांशी चर्चेनंतर चारा छावणी बंद करण्याच्या निर्णयास छावणी मालकाकडून तूर्तास स्थगिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2019 04:37 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी जे चारा छावणी मालक छावणी बंद करणार होते त्यांच्याशी चर्चादेखील केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -