बीड : पहिल्याच पावसात दुष्काळाने होरपळणाऱ्या बीड जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. पाण्याची पातळी तळाला गेलेल्या बीडमधील नद्या वाहू लागल्या आहेत. त्याचबरोबर बीडमधील एका नदीला हिमालयातील नदीसारखं स्वरुप प्राप्त झालं आहे. बीडमधील करपरा नदीच्या पाण्यावर तीन ते चार फूट उंच फेसाचा थर वाहत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हिमालयातील एखादी नदी बीडमध्ये अवतरली आहे काय? असा प्रश्न बीडवासियांना पडला आहे. बीडमध्ये काल (शुक्रवारी) मध्यरात्री रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसाने थोडा जोर धरला आणि करपरा नदीला पाणी आलं. बीड शहरातून वाहणाऱ्या करपरा नदीत मागच्या आठ महिन्यांपासून पाण्याचा थेंबही नव्हता. त्यामुळेच बीड शहरातील सांडपाणी, छोटे ओढे आणि नाल्यांमधून आलेले पाणी कचऱ्यासकट करपरा नदीत साचले होते. पहिल्या पावसाने हा सर्व कचरा वाहून नेला. त्याचवेळी नदीतील पाण्यात मोठ्या प्रमाणात फेस तयार झाला होता. करपरा नदीच्या आसपास बीड ते नामलगावदरम्यान दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठेही कारखाना नाही. त्यामुळे या नदीत कोणत्याही औद्योगिक क्षेत्रातील वाहून जाणारे पाणी येत नाही. तरिदेखील नदीच्या पाण्यावर कशामुळे फेसाचे थर तयार झाले असतील? याचे उत्तर मिळालेले नाही. व्हिडीओ पाहा बीडमध्ये पडलेला पाऊस हा काही मोठा पाऊस नव्हता. पावसाला सुरुवात होऊन अर्ध्या तासात नदी वाहू लागली. तेवढ्या वेळात अमोल गावच्या नागरिकांनी पहिल्या पावसाचे पूजन उरकून घेतले. दरम्यान नदीवरील हा फेस पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक नदीकिनारी जमत आहेत. बीड जिल्ह्यात पुजाऱ्यांकडून पहिल्या पावसाच्या पाण्याची पूजा | एबीपी माझा