नागपूर : नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूरकरांनी आगळावेगळा निरोप दिला. नागपुरातील शासकीय निवास्थानातून मुंबईकडे रवाना होत असताना नागरिकांनी मुंढे यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी केली आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. तर काही तरुण मुंढे यांनी नागपूर सोडू नये म्हणून त्यांच्या गाडीसमोर आडवेही झाले होते. तर अनेक जण त्यांच्या गाडीमागेही धावतही गेले.



नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात लॉ कॉलेज चौकाजवळ महापालिका आयुक्तांच्या तपस्या बंगल्यासमोर आज सकाळपासून मोठी गर्दी जमली होती. काही लोकं हातात तिरंगा ध्वज घेऊन आले होते. तर अनेकांच्या हातात पुष्पगुच्छ आणि छोट्या-छोट्या भेटवस्तू होत्या. हे सर्व आपल्या आवडत्या तुकाराम मुंढे यांना निरोप देण्यासाठी तिथे जमले होते. मी तुकाराम मुंढे, आय सपोर्ट तुकाराम मुंढे, माय रियल हिरो तुकाराम मुंढे अशा आशयाचे अनेक फलक त्या ठिकाणी झळकत होते. भारत माता की जय, इन्कलाब झिंदाबाद, तानशाही नहीं चलेगी अशा घोषणा ही तिथे दिल्या जात होत्या. काही तरुण तर 'आगे आगे मुंढे पीछे पड गये गुंडे' अशी घोषणा ही देत होते....



मुंढे यांच्या घरासमोर जमलेल्या गर्दीमध्ये सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुषांचा समावेश होता. आम आदमी पक्षासह काही संघटनेचे कार्यकर्तेही मुंढे यांना समर्थ देण्यासाठी तिथे उपस्थित होते. मात्र, सर्वाधिक गर्दी तरुणाईची होती. महाराष्ट्र सरकारने आमच्या आवडत्या मुंढे यांची बदली रद्द करावी, अशी मागणी अनेक तरुण करत होते. तर काहींनी नागपूर महापालिकेत नाही तर नागपुरात जिल्हाधिकारी किंवा इतर कुठल्याही पदावर मुंढे यांना बदली देऊन त्यांना नागपुरातच ठेवावं, असा आग्रह अनेकांचा होता. तर काहींनी मुंढे यांनी कोरोना काळात नागपुरात केलेल्या कामाची आठवण काढत आज नागपुरात कोरोनाचा जे तांडव होतंय ते सांभाळण्याची क्षमता फक्त मुंढे यांच्यात होती असे तर्क पुढे केले.



सुमारे दीड तास मुंढे यांच्या घरासमोर समर्थकांची गर्दी होती, यावेळी सोशल डिस्टन्सिंगचाही लोकांना विसर पडला होता. मुंढे यांच्या घरासमोरचा रस्ता महत्त्वाचा असल्याने त्यावरची वाहतूक सांभाळताना आणि लोकांना रस्त्यावरुन बाजूला करताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. अनेक तरुणांसोबत आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचे वाद झाले. काही वेळा पोलिसांनी लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोक तिथून हटायला तयार नव्हते.



साडे नऊच्या सुमारास तुकाराम मुंढे यांची कार गेटमधून बाहेर आली, तेव्हा अनेक तरुण त्यांच्या गाडीसमोर आडवे झाले. मुंढेंनी नागपुरातून जाऊ नये असा आग्रह धरला. त्यामुळे गेटवरच मुंढे कुटुंब बसलेली कार गर्दीच्या गराड्यात काही वेळ अडकून होती. मात्र मुंढे यांनी समजूत घातल्यावर लोकं बाजूला झाले आणि त्यानंतर मुंढे कुटुंबियांची कार हळूहळू रस्त्यावर आली. तिथे मुंढे यांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव करत आगळावेगळा निरोप देण्यात आला. काहींनी तर कारच्या मागे धावत मुंढे यांच्यासोबत दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दी पाहता मुंढे तिथे थांबले नाहीत. ते फक्त लोकांना अभिवादन करत होते. हळूहळू कार बंगल्यापासून दूर गेली आणि लोकांनी आपल्या आवडत्या आयुक्तांना आगळीवेगळी सलामी देत त्यांना निरोप दिला.