इंदापूर : पाऊस नसलेल्या इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये नदीचं पाणी घुसल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भीमा आणि नीरा नदीच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भीमा आणि नीरा नदीला पूर आल्याने अर्धे नरसिंहपूर पाण्यात बुडाले आहे. चारही बाजूंनी नीरा नरसिंगपूरला पुराच्या पाण्याचा वेढा आहे. यामुळे श्री क्षेत्र नीरा- नरसिंहपूरचा पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.


सध्या उजनी पात्रात 1 लाख 60 हजार विसर्गाने पाणी जमा होत असून उजनीमधून 1 लाख 70 हजार क्यूसेकचा विर्सग भीमा नदीत करण्यात येत आहे. तर नीरा नदीमध्ये वीर धरणातून 90 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग येत असल्याने सध्या भीमा नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे नीरा व भीमा नदीच्या संगमावर वसलेल्या नरसिंहपूर तीर्थक्षेत्राचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.



भीमा नदीमध्ये उजनी धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने उजनी काठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. तर कित्येक पूल पाण्याखाली गेले आहेत.

नीरा नरसिंहपूर हे इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे.

सध्या नीरा आणि भीमा या दोन्हीही नद्यांना पूर परिस्थिती ओढावली असून प्रशासनाने ही चोख बंदोबस्त जागोजागी ठेवले आहेत. याआधी 2005-06 साली अशी पूर परिस्थिती ओढावली होती.