Mumbai Nagpur NCP Posters: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. अशातच एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांसोबतच अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांकडून मात्र राज्यभरात अजित पवारांचे पोस्टर्स लावून दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. 


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. असं असतानाच आज मुंबईत (Mumbai News) राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे पोस्टर्स लावून या चर्चांना आणखी हवा देण्याचं काम केलं आहे. या पोस्टर्स वर 'दादा मुख्यमंत्री झाले तर?' असा प्रश्न उपस्थित करून अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात युवकांचे अनेक प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 


यामध्ये बारसू कोकण रिफायनरीचा विरोध, खारघरमध्ये घडलेली महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यानची घटना, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न, पेन्शन योजना, आरोग्य विमा, रखडलेली विकास कामं, पर्यावरण, दहावी-बारावी पेपरफुटी, व्यसनमुक्ती अशा अनेक प्रश्नांना हात घालण्यात आला आहे. 


दरम्यान, 26 एप्रिलला मुंबईच्या चेंबूर भागात आयोजित 'युवा मंथन... वेध भविष्याचा' या कार्यक्रमानिमित्त हे पोस्टर्स झळकविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्याकडून सर्वत्र हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच युवा मंथन या कार्यक्रमाचं आयोजन मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्याकडून करण्यात आलं आहे.


नागपूरमध्येही दादांसाठी बॅनरबाजी 


राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी संपण्याचं नाव घेत नाही. नागपुरातही उत्साही कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं या आशयाची पोस्टरबाजी केली आहे. विशेष बाब म्हणजे, देवेंद्र फडणवीसांच्या घरापासून काही अंतरावरच हे पोस्टर्स झळकावण्यात आले आहेत. नागपूरच्या लक्ष्मीभूवन चौकात आजीत पवार मुख्यमंत्री पदाचे योग्य अजित पवारच मुख्यमंत्री पदाचे योग्य उमेदवार असल्याचे बॅनर्स झळकावण्यात आले आहेत. 


राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी हे होर्डिंग लावले असून देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हे होर्डिंग्स झळकावण्यात आले आहेत. दरम्यान, काल (मंगळवारी) भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री, असे होर्डिंग्स लावले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मात्र यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 


अजित पवारांकडून मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त 


राज्याच्या राजकारणात सध्या एकच नाव धुमाकूळ घालत आहे. ते म्हणजे अजित पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत पूर्णविराम दिला. मात्र, एका मुलाखतीत दादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आणि चर्चांना उधाण आलं. गेल्या 20 वर्षांत अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे दादांकडून वारंवार मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त होत असावी.