मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं आहे. तर औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकावर ध्वजारोहण  करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वांच्या घोषणा केल्या आहेत. 


बीड..
हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झाला. ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक यांना स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या लढ्यात ज्या हुतात्मा यांनी सहभाग घेतला त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेले नुकसान भरपाई लवकरच देण्याचा आश्वासन यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.


नांदेड..
नांदेडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विसावा गार्डन येथील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य ध्वजारोहण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्म्यांना तीन राऊंड फैरी झाडत मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे, आमदार अमर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.


परभणी..
परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात यावे या मागणीसाठी मागच्या अनेक वर्षांपासून परभणीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनानंतर आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे बोलताना परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याची घोषणा केल्यानंतर परभणीत सर्वपक्षीय नेत्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. खासदार संजय जाधव, सेना आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर, यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केलाय.


जालना..
जालना येथे राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी टाउनहॉल परिसरातील मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. 73 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त टोपे यांनी मुक्तिसंग्रामातील स्वतंत्र सैनिकांच्या कुटुंबीयांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.


उस्मानाबाद..
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून पुस्तक प्रदर्शनाचे हे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हा अंकक्षित असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज आहे. ओळखून आज शेतकरी मदत केंद्राचे हे उद्घाटन गडाख यांनी केले आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणा


1.   औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील १४४ निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या नव्यानं बांधणार


2.   पैठण येथील संतपीठाचे  अभ्यासक्रम सुरू करणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी


3.   परभणी येथे 200 बेडसचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय


4.   उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही  वेगाने सुरू


5.   सिथेंटीक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे


6.   हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी


7.   औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना


8.   औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी


9.   सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये


10. औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून


11. परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५०  कोटी रुपये


12. परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा योजना जल जीवन अभियानातून. १०५ कोटी रुपये


13. उस्मानाबाद शहराची  168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना


14. औरंगाबाद : १६८० कोटींच्या  पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश


15. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग. ४.५० कोटी


16. औरंगाबाद - शिर्डी या ११२. ४० किमी मार्गाची श्रेणीवाढ


17. समृद्धीला जोडणाऱ्या १९४.४८ कि.मी.च्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार


18. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन प्रेरणादायी होईल असे उभारणार


19. औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार


20. मराठवाड्यात येत्या  वर्षात जवळपास 200 मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार


21. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश


22. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च


23. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास . 86.19 कोटी रुपये खर्च येईल.


24.  नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. 66.54 कोटी रुपये खर्च.