मुंबई : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) हे ठाणे जिल्ह्यातील 5000 टीबीचे पेशंट (TB patients ) दत्तक घेणार आहेत. मंत्री कपिल पाटील यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त टी बी मुक्त भारत संकल्पनेसाठी प्रत्येक खासदारांनी टी बीचे सहा पेशंट दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री पाटील यांनी पाच हजार पेशेंट दत्तक घेणार असल्याचे सांगितले.
कपिल पाटील यांनी मतदारसंघातील आरोग्यविभागात काम करत असणाऱ्या डॉक्टरांकडून याबाबतची माहिती घेतली आहे. कल्याण पश्चिम, भिवंडी, ग्रामीण बदलापूर या परिसरातील पाच हजार टी बी पेशंट असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यांतर हे सर्व पेशंट मी सहा महिन्यापर्यंत दत्तक घेतले आहेत, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.
पुढचे सहा महिने प्रत्येक महिन्याला या पेशंटना किट देणार आहोत. एका महिन्याचा खर्च 600 रुपये आहे, आमचे किट आणि शासकीय औषध या माध्यमातून पेशंट टी बी मुक्त होतील. भिवंडी लोकसभा टी बी मुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यात यश येईल असा विश्वास असल्याचे सांगत जिथे जिथे परिस्थिती आहे, शिवाय ज्यांची क्षमता आहे त्यांनी असे रुग्ण दत्तक घेत भारत टी बी मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन कपिल पाटील यांनी केलं.
दरम्यान कपिल पाटील यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज असल्याबाबत बोलले जात आहे. पालकमंत्री पदी शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेवकांनी फेसबुकवर आपली नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील आमदारांना पालकमंत्री पद द्या अशी पोस्ट केली होती. याबाबत बोलताना कपिल पाटील म्हणाले, 'याबाबत मला काय बोलायचं नाही, मात्र यापूर्वीची रचना होती त्या पद्धतीने काही कार्यकर्त्यांनी मागणी केली असेल मात्र आता सत्तेत एकत्र आहोत, पालकमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून भाजप आणि शिवसेना एकत्र मिळून घेतला आहे. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही.
कॉंग्रेसवर टीका
यावेळी बोलताना कपिल यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. "ज्याला अध्यक्ष करायचे होते त्यांनी अध्यक्ष पद फॉर्म भरण्याची तारीख,भूमिका जाहीर केली आणि मुख्यमंत्री पद सोडायला लागू नये म्हणून वेगळी चालही केली. काँग्रेसवर आता कोणाचाच कंट्रोल राहिलेला नाहीय. दररोज वेगवेगळी नावे आपल्याला बघायला मिळत आहेत. इकडे भारत जोडो या६ा सुरू आहे आणि तिकडे काँग्रेस तुटायला लागली आहे. भारत जोडायचा की काँग्रेस जोडायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याची टोला केंद्रीय कपिल पाटील यांनी यावेळी काँग्रेसला लगावला.