मुंबई : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचही विद्यमान खासदारांना पुन्हा लोकसभा निवडणुकांचं तिकीट मिळणार आहे. उदयनराजे, सुप्रिया सुळेंसह पाचही विद्यमान खासदारांना 2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील विद्यमान खासदार आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. मात्र अखेरीस विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत आहेत.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत पक्षातूनच नाराजीचा सूर होता. त्यातच उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपच्या जवळ जात असल्याचं चित्र होतं. आघाडी सरकारचे काढलेले धिंडवडे आणि फडणवीसांवर उधळलेली स्तुतिसुमनं यासारख्या कारणांमुळे उदयनराजेंना यंदा उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र उदयनराजेंच्या तिकीटावरील साशंकतेचे मळभ दूर झाल्याचं म्हटलं जातं.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत मधुकर कुकडे विजयी झाले होते. 2014 मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. तर भाजपच्या नाना पटोलेंनी विजय मिळवला होता. मात्र पटोलेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली जागा पोटनिवडणुकीत काबीज केली. त्यानंतर यंदाही कुकडेंना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे

दुसरीकडे, बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक निवडणूक लढणार असल्याचं आधीच स्पष्ट झालं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे पाचही खासदार आपली जागा राखतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.