सोलापूर: राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव काही कमी व्हायचं नाव घेत नाही. कालपर्यंत रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा चावा घेणारी कुत्री आता चिमुकल्यांच्या जीवावर उठली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माणकेश्वर गावात घडलेली घटना ऐकून थक्क व्हाल. अंगणात खेळणाऱ्या एका चिमुकल्यावर हल्ला करून कुत्र्याने त्याचे कान तोडले. दीड वर्षाच्या या जखमी बालकावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दीड वर्षाच्या या बालकावर भटक्या कुत्र्याने केलेला हल्ला पाहून जशी पालकांची घाबरगुंडी झाली, तसंच या बालकाची अवस्था पाहिल्यावर सामान्य नागरिकही हळहळला. बार्शी तालुक्यातील माणकेश्वर गावात ही घटना घडली. भटक्या कुत्र्याने अक्षरशः चिमुकल्याचे कान तोडले. दीड वर्षाच्या या मुलाचा कान कुरतडून बाजूला काढला. ताहेर बादेला असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे.
प्राथमिक उपचार करून या बाळाला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तुटलेले कान पालकांनी कॅरीबॅगमध्ये आणलेलं पाहून डॉक्टरांच्या अंगावरही शहारे आले. ताहेरला अंगणात खेळत असताना कुत्र्याने जबर चावा घेतला. बाळाचं ओरडणं ऐकून बाहेर आलेल्या आईने कुत्र्याला हुसकवून लावलं खरं. पण तोपर्यंत बाळाचे कान वेगळे झाले होते. आता शासकीय रुग्णालयात बालकावर उपचार सुरु आहेत.
भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या, चावा घेतल्याने होणारा रेबीज, शासकीय रुग्णालयात असणारी रेबीज प्रतिबंधक लसीची कमतरता आणि रस्स्यावर कुत्रे आडवे येऊन होणारे अपघात. यावर उपाययोजना होत नसल्याने भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनत चालली आहे.
या बाळाला आणखी 6 सहा दिवस शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. जखमा खोल असल्याने भरून येण्यासाठी वेळ लागेल. शिवाय तुटलेल्या कानावर प्लास्टिक सर्जरी करता येते का याचा विचार रुग्णालय प्रशासन करत आहे.
भटक्या कुत्र्याचा बाळावर हल्ला, तुटलेले कान कॅरीबॅगमध्ये घेऊन रुग्णालयात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2018 01:54 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यातल्या माणकेश्वर गावात घडलेली घटना ऐकून थक्क व्हाल. अंगणात खेळणाऱ्या एका चिमुकल्यावर हल्ला करून कुत्र्याने त्याचे कान तोडले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -