पालघर : अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे चक्रीवादळामध्ये परावर्तीत होत आहेत. त्यामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेल्या सर्व 455 मासेमारी बोटींना मत्स्यव्यवसाय विभागाने संदेश पाठवून तातडीने माघारी बोलवले आहे. या काळात अरबी समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व बोटी मागे बोलवण्यात आल्या आहेत. दरम्यान, शनिवारी मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. सात ते आठ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.
केंद्र शासनाने 12 सागरी मैलाच्या पलिकडे 15 जून पर्यंत मासेमारी करण्याची मुभा दिली असली तरी, राज्य शासनाने 31 मे पर्यंतच मच्छिमारांना मासेमारी करण्याचे परवाने दिले होते. टाळेबंदी नंतर काही प्रमाणात मासेमारी सुरू करण्यात आली होती. सध्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील 37, सातपाटी येथील 36, एडवण येथील 50, वसई येथील 202 तसेच ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील 130 अशा 455 बोटी समुद्रात मासेमारी करीत आहेत. यामध्ये सुमारे 90 दिवस मासेमारी करणाऱ्या बोटींचाही समावेश आहे.
Monsoon 2020 | मान्सून दोन दिवसआधीच केरळमध्ये दाखल : स्कायमेट वेदर
अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रुपांतरीत होत असल्याने, मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व संबंधित मासेमारी संस्था व मच्छिमारांना निरोप पाठवून, मासेमारी करीत असलेल्या सर्व बोटींना तातडीने माघारी आणण्याची संदेश पाठवले आहेत. या अनुषंगाने या बोटी आज सायंकाळपर्यंत किंवा रात्री उशिरापर्यंत परत येतील, असे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व मासेमारी बोटींना 31 मे पर्यंत मासेमारी करण्याचा परवाना देण्यात आला असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
मान्सून दोन दिवसआधीच केरळमध्ये दाखल
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती स्कायमेट वेदरने दिली आहे. मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज असताना कालचं केरळच्या समुद्रकिनारी दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने केला आहे. स्कायमेट वेदर ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे. मागील वर्षी मान्सून आठ दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळमध्ये पोहोचला होता.
Monsoon Prediction | कोकणसह मुंबई, ठाण्यात 3 ते 5 जूनदरम्यान पावसाचा अंदाज