मुंबई : मान्सूनने केरळमध्ये वर्दी दिल्याची माहिती स्कायमेट वेदरने दिली आहे. मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज असताना आजच केरळच्या समुद्रकिनारी दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने केला आहे. स्कायमेट वेदर ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे. मागील वर्षी मान्सून आठ दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळमध्ये पोहोचला होता.
स्कायमेट वेदरने यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या आधी म्हणजेच 30 मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. पाऊस, ओएलआर व्हॅल्यू, हवेचा वेग इत्यादी अनुकूल आहेत. अखेर भारतीयांच्या चार महिन्यांच्या सणाला सुरुवात झाली, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान याआधी भारतीय हवामान विभागाने मान्सून 1 जून रोजी केरळच्या समुद्रकिनारी दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु आयएमडीने गुरुवारी (28 मे) या अंदाजात बदल करत, सध्याची परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी अनुकून बनली आहे. परंतु मान्सून 5 जून रोजी केरळमध्ये पोहोचेल असं म्हटलं होतं.
मान्सून 28 मे रोजी दाखल होईलं, असं भाकित स्कायमेटने वर्तवलं होतं. यामध्ये दोन दिवस आधी किंवा दोन दिवस नंतर असा फरक असेल, असं म्हटलं होतं.
दोन टप्प्यात पावसाचा अंदाज
दरवर्षी हवामान विभाग दीर्घकालीन अंदाज दोन टप्प्यांमध्ये जारी करतो. पहिला अंदाज एप्रिल तर दुसरा अनुमान जून महिन्यात वर्तवला जातो. यंदा पाऊस सरासरी राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
निम्म्याहून जास्त शेती पावसावर अवलंबून
भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी मान्सून अतिशय गरजेचा आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर आधारित आहे. देशात निम्म्याहून जास्त शेती पावसावर अवलंबून आहे. तांदूळ, मका, ऊस, कापूस आणि सोयाबीनसारख्या पिकांसाठी पाऊस अतिशय आवश्यक असतो. भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस पडतो.