मुलांना शाळा ही घरासारखी वाटावी आणि शाळेतला पहिला दिवस त्यांच्या कायमस्वरुपी आठवणीत राहावा, म्हणून राज्यातील वेगवेगळ्या शाळा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत करतात. मुंबईतील खारमधल्या अनुयोग विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचं औक्षण करुन त्यांना टिळा लावण्यात आला. तोंड गोड करुन फुल देत मुलांचं स्वागत करण्यात आलं.
नाशिकच्या सारडा कन्या विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात गुलाब देऊन लहान शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. उस्मानाबादेतही शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली. नूतन प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला सुंदर रांगोळी काढून फुलांची तोरणं बांधण्यात आली होती. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी फुगे देत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीतील विद्यार्थ्यांचं अनोखं स्वागत केलं. सुनेत्रा पवारांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचं फूल देत, त्यांच्या हाताला धरत शाळेत आणलं.
औरंगाबादच्या मुकुल विद्यामंदिर शाळेने विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी रेन डान्सचं आयोजन केलं. पावसात भिजण्याचा आनंद म्हणजे मुलासाठी मज्जाच, त्यामुळे रेन डान्समध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद बालवाडीतील विद्यार्थ्यांनी घेतला.
धुळ्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब आणि पुस्तकांसोबत मिठाई देण्यात आली. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज हे दृश्य होतं.