अहमदनगर : क्रिकेट सामन्यातील ‘नो बॉल’च्या वादातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमधील श्रीगोंद्यात घडली आहे.


क्रिकेट सामन्यातील नो बॉलवरुन दोन गटात प्रचंड वाद झाला आणि याच वादातून दादा गव्हाणे नावाच्या आरोपीने निलेश काळे याच्यावर गोळीबार केला. यावेळी गोळ्या थेट निलेशच्या छातीत घुसल्यानं तो गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गव्हाणे वाडीच्या मोटेवाडीत ओम साई तरुण मंडळाने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी नो बॉलवरुन दोन गटात वाद झाला आणि या वादाचं पर्यावसन मारहाणीत झालं. यावेळी निलेशच्या मावस भावाला दादा गव्हाणेच्या मित्रांनी मारहाण केली.

या मारहाणीची माहिती मिळताच निलेश जमाव घेऊन गव्हाणेच्या घराकडे गेला. यावेळी जमावानं त्याच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळं चिडलेल्या दादा गव्हाणेनं आपल्या गावठी कट्ट्यातून निलेशवरच गोळीबार केला. ज्यात निलेश गंभीर जखमी झाला. या गोळीबारानंतर दादा गव्हाणे फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.