मुंबई : मुंबईतील कफ परेडच्या मेकर टॉवरमध्ये लागलेल्या आगीत दोघा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बजाज ग्रुपचे अध्यक्ष शेखर बजाज यांचं कुटुंब या आगीतून सुखरुप बचावलं असून दोघा नोकरांना जीव गमवावा लागला आहे.


कफ परेडमधल्या मेकर टॉवरच्या विसाव्या मजल्यावर पहाटे सव्वासहाच्या सुमारास आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात दोन तासांच्या प्रयत्नांनी यश आलं असून बजाज यांच्या घरातील दोन नोकरांचा यात मृत्यू झाला. तर 11 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

आगीची घटना घडली तो फ्लॅट शेखर बजाज यांच्या नावे आहे. आग लागली त्यावेळी शेखर बजाज, त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, सून आणि एक वर्षांचा नातू फ्लॅटमध्ये अडकले होते. बजाज यांचा फ्लॅट 8 बीएचके असून त्यातील सर्व्हंट रुममध्ये आग लागली होती.

अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. तसंच तीन अँब्युलन्स आणि चार वॉटर टँकरही घटनास्थळी दाखल झाले होते. इमारतीच्या 20व्या मजल्यावर आग लागल्याने हायड्रॉलिक शिडीचा वापर करुन आग विझवण्यात आली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.