चंद्रपूरः वसतिगृहात चांगलं जेवण आणि सोयी सुविधा मिळत नसेल तर आपण विद्यार्थ्यांनी उपोषण किंवा लढा दिल्याचं पाहतो. पण चंद्रपुरात एका वसतिगृहात विद्यार्थ्यांनी चक्क भुताचा बळी दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचोली खुर्द गावातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात हा प्रकार घडला आहे.


 

 

शाळा सुरु झाल्या नंतर विद्यार्थ्यांच्या आवाजानं इथला परिसर दणाणून जायला हवा. मात्र या वसतिगृहात भूताचा आवाज येत असल्यानं दीडशे विद्यार्थ्यांनी चक्क वसतिगृहच सोडलं आहे.

 

चिकन आणि मटनसाठी सोडलं वसतीगृह

 

विद्यार्थी वसतिगृह सोडून जाण्यामागं भूताचं कारण देत आहेत. मात्र चिकन आणि मटन बिर्याणीसाठी विद्यार्थ्यांनी भूताचा बळी दिल्याचं वसतिगृहाच्या संचालकांनी म्हटलं आहे.  संचालकांच्या सांगण्यात विश्वासही वाटतो. कारण काही विद्यार्थी वसतिगृहात मिळत असलेल्या जेवणाबाबत संतुष्ट आहेत.

 

 

गणिताची आकडेमोड आणि विज्ञानाच्या समिकरणाचं कोडं सोडवण्यापेक्षा विद्यार्थी भूताच्या मागं लागल्यानं शिक्षकांचीही चिंता वाढली आहे. वसतिगृहात घरच्यासारखं जेवण मिळत नसलं तरी पौष्टिक आहार मिळावा, यात शंका नाही. पण चिकण आणि मटणासाठी भूताचा बळी देऊन शिक्षणालाच सोडचिठ्ठी देणं कितपत योग्य आहे, याचा पालकांनीही विचार करायला हवा.