यवतमाळ : यवतमाळ शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला बुधवारी (8 मे) रात्री दीडच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील शेती विभाग आणि अकाऊंट विभाग पूर्णत: खाक झाला आहे. शिवाय कम्प्युटर, खुर्च्या, कागदपत्रे जळून राख झाली आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं समजतं. रात्री दीड वाजता लागलेल्या आगीवर आज पहाटे पाच वाजता नियंत्रण मिळवण्यात यश आलं. तब्बल चार तास आग धगधगत होती. आग विझवण्यासाठी जाण्याचा मार्ग बंद होता, त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी उशीर झाला, असं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाशा देशपांडे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची बँक म्हणून या मध्यवर्ती बँकेची ओळख आहे. आगीत बँकेतील नेमकं किती नुकसान झालं याबाबतची अधिकृत माहिती पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होईल. बँकेतील जुना रेकॉर्ड जळाला असून शेतकऱ्यांसंदर्भातील बॅकअप डेटामधून सर्व माहिती पुन्हां मिळवली जाईल, अंस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.