मुंबई : कोयना नदीचं पाणी आता कर्नाटकला देऊ नका, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यंदाच्या वर्षी कोयना धरणात कमी पाणीसाठा असल्यानं कर्नाटकला आता पाणी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाईंनी केली आहे.


कोयना धरणात मुळातच यंदाच्या वर्षी कमी पाणीसाठा असल्याने धरणातून कर्नाटकला दिलेल्या आतापर्यंतच्या पाण्याव्यतिरिक्त वाढीवचे अधिक पाणी देऊ नये, असे देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यंदाच्या वर्षी पाण्याची गंभीर स्थिती पाहता कोयनेचे पाणी अन्य राज्यांना न देता महाराष्ट्र राज्याकरिता राखीव ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कर्नाटकच्या मागणीनुसार त्यांना यंदाच्या हंगामात आवश्यक तेवढे पाणी याआधीच दिले आहे. यंदाच्या वर्षी पावसाळा येण्याला आणखी एक ते सव्वा महिने अवकाश आहे. त्यामुळे पाणीसाठा पुरेल की नाही याबाबत साशंकता आहे. कोयना धरण पाटण तालुक्यात असले तरी यंदाच्या वर्षी पाटण तालुक्यात देखील भीषण पाणी टंचाई आहे.

पाटण तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर नदीकाठी वसलेल्या गावांना कोयना नदीतूनच पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच शेतीसाठी देखील शेतकरी कोयनेच्याच पाण्याचा उपसा करत आहेत.

कोयना धरणातील पाण्याची आवश्यकता पाटण आणि सातारा जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना प्राधान्याने आहे. दरम्यान धरणामध्ये जूनअखेर १२.१२ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे हे पाणी जर संपले तर शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू शकते. त्यामुळे कोयनेचे पाणी कर्नाटकला न देता राज्यासाठी राखीव ठेवावे, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

शंभूराज देसाईंनी दिलेलं पत्र