धुळे : धुळे, नंदुरबार अशी दोन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य इमारतीला आग लागली. या आगीत बँकेतील 25 ते 30 कम्प्युटर आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.


 

रविवारी सकाळी साडे आठ ते साडे नऊच्या दरम्यान लागलेल्या या आगीने क्षणार्धात रौद्र रुप घेत बँकेचा तिसरा आणि चौथा माळा गाठला. अग्निशमन दलाच्या जवानांना चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

 

ही आग विझवण्यासाठी धुळे महानगरपालिकेच्या पाच अग्निशमन सह, शिरपूर, मालेगाव, दोंडाईचा, अमळनेर इथून गाड्या दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. आग विझवताना सुविधांच्या अभावी फायर ब्रिगेडचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

 

या आगीत बँकेचं मोठं नुकसान झालं असलं तरी बँकेचा डेटा सेंटर, रेकॉर्ड रुम सुरक्षित असल्याचा दावा बँकेच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात कॅमेरासमोर कोणीही बोलायला तयार नाही.

 

बँकांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा, भ्रष्टाचार, विवादित कर्ज प्रकरण यामुळे बँक आधीच चर्चेत आहे. बँकेवर राष्ट्रवादी, काँग्रेसच वर्चस्व आहे. धुळे महानगरपालिकेत देखील राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. महानगर पालिकेतील वसुली विभागाची भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरु असताना 17 जून 2011 या दिवशी या विभागाला आग लागून हा विभाग जळून खाक झाला होता. या घटनेचे विस्मरण धुळेकरांना होत नाही तोच बँकेला लागलेल्या आगीत संशयाचे धूर असल्याची चर्चा धुळे , नंदुरबार जिल्ह्यात सुरु आहे.