नांदेड : कोरोना काळात अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड आली असताना नांदेंड येथे कृषी सहाय्यक पदावर असलेल्या तरुणाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कोरोना काळात हक्काचा रोजगार मिळवून दिलाय. कोरोनासारख्या वातावरणात व्यवसाय, उद्योगधंदे बंद असताना 'फिरती चहा' नावाची ऑनलाइन चहा हॉटेल सुरु करुन पाच तरुणांना रोजगार उभा करून दिलाय. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या  'फिरती चहा' या ऑनलाइन चहाला नांदेड शहरात चांगला प्रतिसाद मिळतोय.


कोरोना महामारीत रोजगार हरवलेल्या नांदेड येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रसाद तोटवाड नावाच्या कृषी सहाय्यक पदावर असणाऱ्या तरुणाने आपल्या कल्पकतेच्या आधारे हा रोजगार मिळवून दिलाय. प्रसाद हे व्यवसायाने कृषी सहाय्यक असले तरी त्यांना उद्योगधंद्याविषयी नेहमीच रुची राहिलीय. त्यामुळे त्यांनी नोकरी करत करत अनेक मार्केटिंग कंपन्यामध्ये आपली गुंतवणूक करुन आपला व्यावसायिक स्तर वाढवण्याचा प्रयत्न केलाय. शासकीय नोकरी करत असताना उर्वरित वेळेत नेटवर्क मार्केटिंग, ऑनलाइन उद्योग, अशा विविध उद्योगा आधारे जास्तीचा नफा मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेयत. त्यातून त्यांना महिन्याकाठी 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्नही मिळत होते. परंतु कोरोना महामारीमुळे हे उत्पन्न हळूहळू कमी होत ,बंद झाले.


कोरोना महामारीतून आणखी इतर मार्गाने उत्पन्न मिळवण्यासाठी व कोरोना काळात रोजगार गेलेल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी 'फिरती चहा' ही ऑनलाइन हॉटेलची संकल्पना मनात आणली आणि ऑनलाइन चहा विक्री सुरु केलीय. प्रसाद यांनी ऑनलाइन मार्केटिंगचा फंडा लक्षात घेऊन ऑनलाईन चहा विक्रीसाठी 'फिरती चहा'   हॉटेलही सुरु केलंय. या फिरती चाय हॉटेलच्या माध्यमातून प्रसाद यांनी पाच सुशिक्षित तरुणांना रोजगार देऊन मदतीचा हात दिलाय.


फिरती चहा हॉटेलच्या  माध्यमातून दिवसाकाठी 21 लिटर चहा प्रसाद विकतात. त्यानुसार एका साडेतीन लिटर चहाच्या किटलीमागे 150 रुपये मोबदला तरुणांना दिला जातो. यात प्रत्येक तरुण शहरातील बँक, दवाखाने, मोटारसायकल शोरुम, जिल्हा परिषद, शाळा, महाविद्यालयात व न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने चहा विक्री करतात. त्यातून  दिवसाकाठी सात लिटर ऑनलाइन चहा विकला जाऊन त्यांना 300 रुपये रोजगार मिळतो. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करुन व पूर्ण खबरदारी घेऊन हा चहा बनवला जातो व ऑनलाईन ऑर्डर घेऊन, ग्राहकांपर्यंत पोहचवला जातो. प्रसाद यांच्या संकल्पनेतून फूड डिलिव्हरी झोमेटो प्रमाणे तयार झालेल्या या ऑनलाइन चहाला अल्पावधीतच चांगली प्रसिद्धी मिळालीय. यातून पाच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार तर मिळालाच पण प्रसाद यांना सुद्धा दिवसाकाठी सातशे रुपये रोजगार मिळतो. त्यामुळे कोरोना काळात रोजगार गमावलेल्या तरुणांना फिरती चहा या ऑनलाइन हॉटेलमुळे मदतीचा हात मिळालाय.


महत्वाच्या बातम्या :