नागपूर : ओबीसींचा राजकीय आरक्षण त्यांना मिळू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा कट असून हे दोघेच सरकारमधील झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोप भाजप नेते  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. विधानसभेत काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्यानंतर आज नागपूर आणि पुण्यात भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे तर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार घोषणाबाजी करत आहेत. या 12 आमदारांचे निलंबन लोकशाहीच्या विरोधात आहे, तसेच ते नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्यांचं निलंबन परत घेण्याची मागणी केली आहे.


भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपुरच्या बडकस चौकात राज्य सरकारच्या विरोधआत जोरदार आंदोलन केलं. त्यामध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावन्नकुळे सामील झाले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत सरकारचा पुतळाही जाळण्यात आला. या पुतळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काल तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांचे फोटो लावण्यात आले होते. पुतळा दहन करताना भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली. 


राज्य सरकारने राज्यातील येणाऱ्या निवडणुकामधून ओबीसींना बाजूला काढून त्या जागा धनधांडग्यांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  काही झारीतील शुक्राचार्य हे आरक्षण ओबीसींना मिळू नये यासाठी प्रयत्न करत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोपही यावेळी बावनकुळे यांनी केला.


पुण्यातही आंदोलन
एखाद्या पक्षाच्या आमदारांनी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मांडताना त्यांना निलंबित केलं जात आहे, हा लोकशाहीचा खून आहे असा आरोप करत पुण्यात भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे.


आजच्या आज निलंबित आमदारांचे निलंबन परत घेतले गेले नाही, तर भाजप रस्त्यावर उतरुन सरकार विरोधात मोठं जनांदोलन उभारेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.


राज्यातील सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर तालिका अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या 12 आमदारांनी सभागृगात गैरसंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना एक वर्षासाठी निलंबित केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :