अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी देवस्थानच्या तत्कालीन विश्वस्थ मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात सुमारे 2 किलो सोने पुरून त्यावर मंत्रोपचारासाठी 25 लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि माहूरच्या रेणुका मातेचे माहेरघर म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले मोहटा देवी देवस्थान प्रसिद्ध आहे अहमदनगर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. 2010 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी मंदिर बांधताना मंदिराच्या पायामध्ये 1890 ग्रॅम सोनं पुरलं होतं. हे सोनं पुरताना त्याच्यावर मंत्रोच्चार देखील करण्यात आले आणि या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च करण्यात आला. या सर्व अंधश्रद्धेमुळे केल्यामुळे तत्कालीन विश्वस्त प्रकाश गरड यांनी आवाज उठवला आणि न्यायालयात याचिका दाखल केली.
अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात दोन किलो सोने पुरून त्यावर मंत्र उपचाराच्या नावाखाली 25 लाख रुपये खर्च केल्याने दोषींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. दरम्यान मोहटा देवीच्या 2010 चे तत्कालीन देवस्थान समितीचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्यासह विश्वस्त मंडळ व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात कट रचून आर्थिक फसवणूक करणे व अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी, कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळी जादु नियम 2013 कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात सह अहमदनगर जिल्ह्यात एकच चर्चा सुरु आहे.