दारुच्या ब्रँडला महिलांचं नाव, गिरीश महाजनांविरोधात तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 05 Nov 2017 06:49 PM (IST)
दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजनांविरोधात चंद्रपुरातील मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चंद्रपूर : दारुच्या ब्रँड्सना महिलांची नावं द्या, म्हणजे खप वाढेल, असं विधान करुन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन चांगलेच अडचणीत आले आहेत. चंद्रपुरात महाजनांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजनांविरोधात चंद्रपुरातील मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महाजनांनी या वक्तव्याद्वारे महिलावर्गाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यातील पाणीटंचाई निवारणाचे प्रयत्न करा, दारुचे मार्केटिंग कन्सल्टन्ट होऊ नका, असं महाजनांना सांगण्यात आलं आहे. गिरीश महाजन यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही गोस्वामी म्हणाल्या.