लातूर : उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या लातूरच्या 26 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उदगीरमध्ये राहणाऱ्या सुनील बालाजी बिरादारने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठात ऑगस्ट महिन्यात प्रवेश घेतला होता.


सुनीलचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून शुक्रवारी सकाळी सुनीलचे वडील बालाजी बिरादार यांना अमेरीकेहून फोन आला. त्यानंतर घरात एकच आक्रोश सुरु झाला.

सुनीलच्या वडिलांची उदगीर तालुक्यात हैबतपूरमध्ये शेती आहे. सुनीलने पुण्यातील सिंहगड युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. आठवीपर्यंत उदगीरच्या लाल बहादूर शाळेत, तर बारावीपर्यंत हैदराबादमधून त्याने शिक्षण घेतलं होतं. सुनील 5 ऑगस्ट रोजी भारतातून तो अमेरिकेत गेला होता. अवघ्या तीनच महिन्यात ही दुर्देवी घटना घडली.

सुनील स्वभावाने अतिशय शांत स्वभावाचा असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. शुक्रवारी ( 27 ऑक्टोबर ) त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. तो त्याच्या मित्रांमुळे टेंशनमध्ये असल्याचं म्हणाला होता. मी त्याला परत भारतात बोलावलं, असंही वडील म्हणाले.

सुनीलचा मृतदेह भारतात आणण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेण्यात आली. त्यांनी ताबडतोब दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात फोन लावून घटनेची माहिती दिली. सुनीलच्या कुटुंबीयांना सुनीलचं पार्थिव भारतात आणण्याचं आश्वासन दिलं.