नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात धनगर समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं भाषण जेव्हा सुरु झालं, तेव्हा मंचावरच मुख्यमंत्र्यांची पंचाईत झाली.
कारण, धनगर आरक्षणाच्या वायद्याची आठवण करुन देण्यासाठी धनगर समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी चक्कं काही गाणी वाजवली. या गाण्यांच्या दरम्यान एक-एक ओळीचा तपशील सुद्धा होता. ज्यातून मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्यानंतर वेगवेगळ्या काळात काय-काय शब्द दिला, याची त्यांना आठवण करुन देण्यात आली.
ही गाणी वाजवून झाल्यानंतर आपण आरक्षणाचा शब्द विसरलो नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. धनगर आरक्षणाचं आश्वासन आपण विसरलो नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आघाडी सरकारच्या चुकीमुळे धनगर आरक्षण रखडलं. मात्र आम्ही नव्याने अहवाल तयार करुन केंद्राकडे पाठवणार आहोत. डिसेंबर 2017 मध्ये हा अहवाल येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
''गोपीनाथ मुंडेंनी दिलेला शब्द पूर्ण करणार''
निवडणुकीअगोदर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना धनगर समाजाबाबत भूमिका काय, असं विचारलं होतं. त्यांनी सांगितलं धनगर समाज हा जन्मभर आपल्या पाठिशी उभा राहिलेला समाज आहे. त्यांना न्याय दिलाच पाहिजे. त्यामुळे प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून सत्ता आल्यावर त्यांना आरक्षण देऊ, हे आश्वासन दिलंच पाहिजे. हे आश्वासन पर्ण करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव
सोलापूर विद्यापीठाला अखेर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आलं आहे. नागपुरात झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद सुरु होता.
विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव दिलं जावं, असा एका समुहाचा आग्रह होता. तर दुसऱ्या बाजूला विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर यांचं नाव दिलं जावं, अशीही मागणी होत होती. मात्र आज अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.