प्रशस्त फलाट, मोठे वाहनतळ, सर्व सोयींनी युक्त चौकशी कक्ष, माहिती कक्ष, सुविधाजनक तिकीट खिडक्या, प्रसाधनगृहे, पाण्याच्या सोयी, सीसीटीव्ही यंत्रणा, उपहारगृहे, अतिशय सुंदर भित्ती चित्रे आणि बरंच काही. अशा सोई सुविधांनी युक्त हे बसस्थानक बनवण्यात आले आहे.
बल्लारपूर म्हणजे तेलंगणातून महाराष्ट्रत प्रवेश करताना लागणारं पहिले मोठे शहर. वूड सिटी, पेपर सिटी अशी शहराची ओळख. मात्र आता बल्लारपूरची नवीन ओळख येथील बसस्थानक झाली आहे. सध्या या बस स्थानकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वर्षभरापूर्वी 'मिनी भारत' समजल्या जाणाऱ्या या शहरात अत्याधुनिक बसस्थानक निर्मितीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. यासाठी 14 कोटी रुपये निधी मंजूर केला गेला. दक्षिणेत ये-जा करण्यासाठी अत्यंत सोयीच्या असलेल्या या शहरात वर्दळीच्या भागात आणि शहराच्या मध्यभागी हे स्थानक उभारण्यात आले आहे.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ असल्यामुळे अगदी वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे आता सामान्य नागरिकांच्या हक्काची 'लाल परी' या अत्याधुनिक बस स्थानकात प्रवासी वाहतुकीसाठी दिमाखात सज्ज झाली आहे.
बल्लारपूर बसस्थानकाचे वैशिष्ट्ये
एक लाख स्केअर फूट क्षेत्रात हे बसस्थानक उभारण्यात आलं असून बस स्थानकाची इमारत ही जवळ-जवळ 40 हजार स्केअर फूट क्षेत्रात आहे. 500 लोकांच्या बसण्याची येथे व्यवस्था असून दिव्यांगांसाठी देखील खास सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक बसस्थानकावर सुविधा तर आहेतच, याशिवाय शहराच्या प्रमख भागातून नजरेस पडणारे द्विमितीय घड्याळ, आकर्षक रंगसंगतीचा वापर करून तयार केलेली अंतर्गत सजावट, व्हर्टिकल गार्डन, ठीक ठिकाणी तयार केलेले सेल्फी पॉईंट बल्लारपूरकरांच्या पसंतीस उतरले आहेत.
लोकार्पणाच्या आधीच हे बस स्थानक बघण्यासाठी आणि इथल्या वेगवेगळ्या सेल्फी पॉईंट्स वर सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी उसळली आहे. जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वाघोबाची मनोहारी भित्तीचित्रे, सुबक वन्यजीव आणि जंगल चितारण्यात आले आहे. 'एवढे पंचतारांकित बसस्थानक आणि सुविधा उभारल्या आता नवीन बसेस देखील प्रवाशांच्या सोयीसाठी द्या' अशी सहज प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविली आहे.
VIDEO | 14 कोटी खर्चून बल्लारपूर स्टॅंडचं रुपडं पालटलं | चंद्रपूर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा