बीड : आमच्या दोन्ही भगिनी एक खासदार तर एक पालकमंत्री आहेत. कुणी पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांसारखे राजकीय प्रश्न कळतात असं नाही. तुमच्या वडिलांच्या नावाने काढलेलं महामंडळ रद्द केले तरी तुम्ही सत्तेला चिटकून बसला आहे. माझ्यासारखा अशा सत्तेला लात मारून निघून गेला असता, अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडें यांनी पंकजा आणि प्रीतम मुंडेंवर टीका केली. केवळ माझे बाबा म्हणल्याने मतं आता पक्की होत नाहीत, असेही ते म्हणाले.
बीड जिल्ह्यातील पोटादा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुंडे यावेळी म्हणाले की, एवढं सगळं तुम्ही भरभरून दिलं मात्र तुम्हाला काय मिळालं. 2004 ची पुनरावृत्ती पुन्हा 2019 ला होणार आहे. बीडचा उमेदवार सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे, असे ते म्हणाले.
मुंडे यावेळी म्हणाले की, शेतकऱ्याला बायकोसोबत ऑनलाइन कर्जमाफीसाठी का बोलवता? याविषयी मुख्यमंत्र्यांनाही मी बोललो. जर शेतकऱ्याचे बायकोसोबत भांडण झाले असेल आणि बायको सोबत यायला तयार नसेल तर मग कर्जमाफी कशी मिळणार? असा सवाल मुंडे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, दबंग खासदार म्हणजे दादागिरी करणारे खासदार. असे नाव आमच्या बहिणीला कुणीतरी 'दबंग' नाव दिले, मला त्यांची कीव येते. दोन्ही बहिणींना एवढाच प्रश्न आहे की, तुमच्या कारकिर्दीत शेजारच्या लातूरला रेल्वे डब्बा बनवण्याचा कारखाना झाला तुम्ही काय केले, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
भाजपही आमची मॅच फिक्सिंग आहे असं सांगतंय. पण आमचा उमेदवार मॅच विनिंग आहे. राजकारण हे जर जणावरांच्या छावणीत करत असतील तर यांची पातळी किती खालावली, असा आरोपही त्यांनी केला. कर्तृत्वाने अमरसिंह पंडित मोठे असतील तरी बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली, असे ते बीड लोकसभेच्या उमेदवारीवरुन बोलताना म्हणाले.
पोटी जन्म घेतला म्हणून वडिलांसारखे राजकीय प्रश्न कळतात असं नाही, धनंजय मुंडेंची पंकजा-प्रीतम मुंडेंवर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2019 04:19 PM (IST)
दबंग खासदार म्हणजे दादागिरी करणारे खासदार. असे नाव आमच्या बहिणीला कुणीतरी 'दबंग' नाव दिले, मला त्यांची कीव येते. दोन्ही बहिणींना एवढाच प्रश्न आहे की, तुमच्या कारकिर्दीत शेजारच्या लातूरला रेल्वे डब्बा बनवण्याचा कारखाना झाला तुम्ही काय केले, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -