नागपूर : पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित दहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आणि पाच फरार असलेल्या आरोपींविरुद्ध 5,160 पानांचे दोषारोपपत्र ‌दाखल करण्यात आले आहे.


सहा जूनला अटक झालेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन आणि फरार असलेले कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडे, किशनदा बोस, प्रकाश उर्फ ऋतुपर्ण गोस्वामी, कॉम्रेड दीपू आणि कॉम्रेड मंगलू यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात गुन्हा नोंद झालेल्या सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्सालवीस, अरुण फरेरा, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी सुरू असल्याने त्यांच्याविरोधात नंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार आहे. दोषारोपपत्र दाखल झालेल्या दहा जणांनी सीपीआय माओईस्ट या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या निर्देशानुसार एल्गार परिषद आयोजित केली. या एल्गार परिषदेमुळे दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात वाढ झाली.

रोना विल्सन आणि फरार असलेल्या कॉम्रेड प्रकाश यांच्यात ई मेल द्वारे झालेल्या चर्चेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाची चर्चा झाल्याचे समोर आले. अरुण फरेरा याने खैरलांजी हत्याकांडाच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनात लोकांना जमवाजमव करण्यास मदत केली होती, असे सांगण्यात आले आहे.

कोरेगाव-भीमामध्ये काय घडलं होतं?
कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1 जानेवारीला विजय दिवस साजरा करण्यात आला. कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.

कुणावर गुन्हे दाखल झाले?
या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसरीकडे, एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कबीर कला मंचचा समावेश करण्यात आला. कबीर कला मंचाने एल्गार परिषदेत सादर केलेल्या गीतांतून लोकांना चेतवल्याचा गुन्हा पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.