Dhule News Update : शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी माजी खासदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. बापू चौरे असे गुन्हा दाखल झालेल्या खासदारांचे नाव आहे. चौरे यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस नीरीक्षक, मंडल अधिकारी, तलाठी, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीचे मॅनेजर आणि विभागीय व्यवस्थापक अशा एकूण अकरा जणांविरुद्ध धुळ्यातील साक्री पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1988 मध्ये हा फसवणुकीचा हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.
धुळे जिल्ह्यातील दहिवेल (ता. साक्री) शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तत्कालीन खासदार बापू चौरे यांनी 3 मे 1988 रोजी साईबाबा सर्विस या हिंदुस्तान पेट्रोल पंपाची सुरुवात केली होती. परंतु, चौरे यांनी प्रत्यक्षात ज्या जागेवर पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली होती तेथे पंप सुरू न करता दुसऱ्या जागेवर पंप सुरू केला. दुसऱ्या जागेवर पेट्रोल पंप सुरू करून चौरे यांनी शासनाची फसवणूक केली असल्याचे समोर आले होते. तब्बल 34 वर्षानंतर हा प्रकार समोर आला असून यामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर सुरत राज्य महामार्ग क्रमांक 6 वरील रिटेल आउटलेट पेट्रोल पंप मंजुरीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडे बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती. न्यायालयात याबाबत खटला चालल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशावरून, माजी खासदार बापू चौरे यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीचे मॅनेजर आणि विभागीय व्यवस्थापक अशा एकूण अकरा जणांविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या