सोलापूर : भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुरातील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखालपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या विरोधात बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना अनेक राजकीय नेत्यांवर कडाडून टीका केली होती. भाजप नेते नारायण राणे यांचा नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरे यांनी त्यांवर टीका केली होती. त्याला प्रत्यूतर देताना नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीने स्वतःची प्रतिष्ठा राखली, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात त्याचा अभाव जाणवला. निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. दसरा मेळाव्यातील भाषणात एकाही विकास कामाचा उल्लेख नाही, कोरोनाचा उल्लेख नाही. जवळपास 43 हजार रुग्ण महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडले. याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येत नाही का? असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला होता.
पाहा व्हिडीओ : ठाकरे विरुद्ध राणे! 'कुणाला बेडुक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट', राणेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
मात्र मुख्यमंत्र्यावर टीका करताना पुळचट, निर्बुद्ध अशी शिवीगाळीची आणि दमदाटीची भाषा वापरुन शिवसैनिकांचा अपमान केल्याचा आरोप बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केला. त्यामुळे नारायण राणे यांच्याविरोधात भांदवि कलम 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रारी अर्ज दिले होते. जर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन योग्य कारवाई केली नाही, तर 2 नोव्हेंबरला नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन केले जाईल असा इशारा देखील भाऊसाहेब आंधळकर यांनी दिला होता. त्यांच्या या तक्रारीनंतर बार्शी शहर पोलीस स्थानकात भांदवि कलम 504, 506 नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
"नारायण राणे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री पद दिलं होतं. बाळासाहेबांनी राणे यांच्यावर अनेक उपकार केले होते. राणेंमुळे शिवसेना वाढण्यास मदत ही झाली असेल. मात्र अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं हे शिवसैनिकांना खपणारं नाही. यासोबतच सामान्य जनता म्हणून देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी भाषेत टीका करणं हे निंदनीय आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे." अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बेईमानी करून, हिंदुत्वाला मूठ माती देऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
#Shivsena शिवसेना नेत्यांकडून राणेंचा समाचार, राणेंचं मेडिकल चेकअप आणि NCB चौकशी करावी ही मागणी