सांगली : ऑगस्ट महिन्यात नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जप्त करण्यात आलेल्या 83 किलो सोने तस्करी प्रकरणी एनआयएच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील काही भागात पुन्हा छापेमारी केली. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने खानापूर तालुक्यातील जाधववाडी गावामध्ये काही संबंधितांची चौकशी केली. त्यामुळे दिल्लीत सापडलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणाशी सांगली जिल्ह्याशी असलेले कनेक्शन अधिकच गडद होत चालले आहे. या तस्करी प्रकरणात यापूर्वी मूळचे आटपाडी तालुक्यातील असणाऱ्या आठ जणांना अटक झालेली आहे.
दोन महिन्यांपूर्वी 28 ऑगस्ट रोजी दिल्ली रेल्वे स्टेशनवर 83. 621 किलो सोने जप्त करण्यात आले होते. आठ जण हे सोने गुवाहाटीवरुन दिल्लीला रेल्वेमधून आणत होते. त्यावेळी दिल्ली रेल्वे स्टेशनवर डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) या आठ जणांना 42 कोटी बाजारमूल्य असलेल्या या सोन्याच्या बिस्किटांसह पकडले होते. त्या संदर्भात या आरोपींची सखोल चौकशी सुरु आहे. त्यातून अधिक तपासणी करण्यासाठी एनआयएच्या टीमने खानापूर तालुक्यात जाधववाडी येथे छापे टाकले. यावेळी या पथकाने याप्रकरणी काही जणांची चौकशी केली.
हे आठ जण स्वतःची खरी ओळख लपवून बोगस आधारकार्ड बनवून प्रवास करत होते. म्हणून त्यांच्यावर दहशतवादाच्या वाढीसाठी रसद पोहोचवणे, दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणे तसेच दहशतवादी साहित्याचा प्रचार-प्रसार करुन तरुणांच्या मनात दहशतवादाची बीजे रुजवणे इत्यादी यूएपीए (सुधारित) कायदा म्हणजेच बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायदा 1967 अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. दरम्यान मागच्याच महिन्यात सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील काही लोकांची चौकशी या पथकाने केली होती. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरु आहे.